Saif Ali Khan Attack: चाकूचा तुकडा शोधण्यासाठी पोलीस वांद्रे तलावाजवळ, सैफ अली आणि करिनाला पोलीस संरक्षण

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लामला घेऊन आज पोलीस वांद्रे तलावाजवळ गेले. पोलीस त्या चाकूच्या तुकड्याचा तलावाजवळ शोध घेत होते. रात्री उशिरा पोलिसांनी शोध मोहीम संपवून शरीफुलला पुन्हा वांद्रे पोलीस ठाण्यात आणले.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यासाठी मोहम्मद शरीफुलने चाकूचा वापर केला होता. घटनास्थळी चाकूचा एक तुकडा आणि दुसरा तुकडा सैफ अलीच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला, तर चाकूच्या खालच्या बाजूची मूठ असलेला भाग अद्याप पोलिसांना मिळाला नाही. चाकू हा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसानी चाकूचा तुकडा शोधण्यावर भर दिला आहे. मोहम्मद शरीफुलने त्याने तो चाकूचा तुकडा नेमका कुठे फेकला हे अद्याप सांगितले नाही. त्यामुळे आज सायंकाळी वांद्रे पोलिसांच्या पथकाने मोहम्मद शरीफुलला पोलीस बंदोबस्तात वांद्रे तलाव येथे नेले होते.

सैफ अली आणि करिनाला पोलीस संरक्षण

चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर आता सैफ अली खान आणि करिना कपूर याना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. काही दिवस पोलीस त्या दोघांसोबत असणार आहेत. नेमकी कोणत्या दर्जाची सुरक्षा त्या दोघांना देण्यात आली आहे हे स्पष्ट झालेले नाही.

रिक्षाचालकाचे मानले आभार

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला रिक्षाचालक भजन लाल सिंहने लीलावती रुग्णालयात नेले. भजन लालने वेळेत रिक्षा लीलावती नेली होती. आज भजन लाल हे अभिनेता सैफ अली खान याच्या घरी गेले होते. सैफ अली खान यानी भजन लाल याचे आभार मानले.