लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून पैसे परत घेतील आणि योजना बंद करतील; आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्ला

लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने अपात्र ठरवायचे, त्यांच्या खात्यातून पैसे परत घ्यायचे आणि नंतर योजनाच बंद करून टाकायची असा महायुती सरकारचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर ही योजनाच गुंडाळण्याची तयारी सरकार करत असल्याचे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची विविध विभागांच्या मदतीने छाननी केली जाणार आहे. याच मुद्दय़ावरून टीका करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. अपात्र महिलांची यादी वाढवत न्यायची आणि नंतर योजनाच बंद करायची अशा सरकारच्या हालचाली सुरू आहेत असे ते म्हणाले.

शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला असल्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर, उदय सामंत तर मिंधे गटाचे आमदारही फोडण्याच्या विचारात आहेत अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली. जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपने महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे आणि फोडाफोडीचेच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मिंधे गटानेही उद्या शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त मेळावा आयोजित केला आहे. त्यात संगीत कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मिंधे गटाच्या मेळाव्यात गायक आहेत तर आमच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नायक आहेत.