उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांना म्हाडाने दणका दिला आहे. विकासकांनी रखडवलेले पाच प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतले असून आता नवीन विकासक नेमून ते प्रकल्प आता म्हाडाच पूर्ण करणार आहे. त्या बदल्यात म्हाडाला येथे मोठय़ा प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार असून भविष्यात मास्टर लिस्टवरील भाडेकरूंसाठी ही घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
उपकरप्राप्त इमारत धोकादायक झाल्यानंतर त्याचा पुनर्विकासासाठी संबंधित इमारत मालकाने म्हाडाकडून नोटीस आल्यानंतर सहा महिन्यांत पुनर्विकास प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. त्यानुसार म्हाडाने पुनर्विकासासाठी एनओसी दिल्यानंतर मालकाकडून विकासक निश्चित केला जातो. अनेक विकासकांनी आर्थिक अडचण किंवा वेगवेगळय़ा कारणांनी पुनर्विकास प्रकल्प रखडवले आहेत. याचा फटका रहिवाशांना बसतो. या पार्श्वभूमीवर एनओसी देऊनही प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या विकासकांकडून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने म्हाडा अधिनियमातील नवीन कलम 91 अ नुसार पाच पुनर्विकास प्रकल्प काढून घेतले आहेत. म्हाडा आता स्वतःच्या अधिकारात हे प्रकल्प पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. म्हाडाने ताब्यात घेतलेल्या पाच इमारतींपैकी दोन इमारती जी नॉर्थ विभागात तर तीन प्रकल्प एफ साऊथ विभागात आहेत. सद्यस्थितीत यातील काही जुन्या इमारती तोडण्यात आल्या आहेत, तर काही इमारतींचे काम विविध मजल्यांपर्यंत पोहचून अर्धवट बंद पडले आहे.