प्रासंगिक – नेताजींचे पुण्यस्मरण!

>> वृषाली पंढरी

थोर  स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नेताजींची सव्वाशेवी जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी करण्याचे जाहीर केले होते. यानिमित्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या कालखंडात उदयास आलेल्या एकाहून एक श्रेष्ठ नेत्यांपैकी वीर सावरकर वगळता लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल हे सर्व जण काँग्रेसचेच थोर नेते होते. या सर्वांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य. त्यांचे वकृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरचा आपसूकच त्यांच्याशी आणि पुढे स्वातंत्र्यलढय़ाशी जोडला जाई. सुभाषचंद्र बोस यांनी दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी  जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ‘जय हिंद’चा नारा आजही भारताचा राष्ट्रीय नारा बनून राहिला असून अभिमानाने प्रत्येक नेता आपल्या भाषणाची सांगता याच नाऱ्याने करतो.

नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की जर 1947मध्ये नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता असे म्हटले जाते. अगदी गांधीजींचेदेखील असेच मत होते. लहानपणीच कटक रॅवेंशॉ कॉलिजिएट हायस्कूलमधील वेणीमाधव दास या शिक्षकांनी त्यांच्यातील सुप्त देशभक्ती जागृत केली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत असे. कोलकात्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयातील एक इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. याविरोधात सुभाषचंद्र बोस यांनी महाविद्यालयात संप पुकारला होता. 1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची कामे करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून, त्यांना भारतीय नावे देण्याचे धाडस दाखवले. स्वातंत्र्यलढय़ात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकऱ्या मिळवून दिल्या. लवकरच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली.

सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदी क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की, याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे सत्यवादी गांधीजींना मान्य नव्हते. दुर्दैवाने इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले होते. आपल्या जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला.

आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी ‘झाँसी की रानी’ रेजिमेंटही बनवली होती. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे व आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ही आवाहने करताना त्यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ असा नारा दिला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौज माघार घेत असताना जपानी लष्कराने नेताजींना निसटून जाण्यासाठी व्यवस्था केली. पळून जाणे शक्य असूनही नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच तयार केला.