बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांनी फास आवळला आहे. गेल्या अवघ्या 20 दिवसांत 93 गुन्ह्यांची नोंद करत 138 बांगलादेशींना पकडले. याशिवाय तीन घुसखोरांना कायदेशीर बाबी पूर्ण करत मायदेशी पाठवले आहे.
घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात जोरदार धडक मोहिम उघडली आहे. दरदिवशी धरपकड करून त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. एस्प्लनेड 8 वे न्यायालय देखील यांची गंभीर दखल घेत घुसखोरांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना मायदेशी पाठविण्यास पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे वर्ष 2024 मध्ये तब्बल 164 बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी हिंदूस्थानातून हुसकावून लावले. शिवाय या वर्षीच्या पहिल्या 20 दिवसांत पोलिसांनी 93 गुन्हे दाखल करून 138 बांगलादेशींना पकडले. तसेच तीन घुसखोरांना त्यांच्या मायदेशात पाठवले.