बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अभिनेता सौफ अली खानवर त्याच्या घरातच एका बांगलादेशी घुसखोराने हल्ला केल्याच्या घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा तापत आहे. आता याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला जाग आली आहे. बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोराकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (TISS) केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमार मधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. काही राजकारण्यांकडून अशा घुसखोरांचे ‘वोट बँक’ म्हणून लांगूलचालन सुरू आहे. बेकायदेशीरपणे देशात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्राने यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. आता अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाला जाग आली असून त्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.