उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा इतका भव्य आहे की तो अंतराळातूनही दिसतो आणि हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)ने प्रसिद्ध केलेल्या प्रतिमांवरून हा मेळा किती भव्य आहे हे फोटोंमधून दिसत आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या 45 दिवसांच्या या भव्य कार्यक्रमाला 40 कोटींहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
दर 12 वर्षांनी होणाऱ्या या पवित्र धार्मिक कुंभ मेळ्याला जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून ओळखले जाते. या कार्यक्रमाला मोठ्या साधू, यात्रेकरू आणि पर्यटक उपस्थित असतात.
इस्रोने काढलेल्या प्रतिमांमध्ये मेळ्यातील यात्रेकरूंसाठी तयार करण्यात आलेली निवास व्यवस्था, पायाभूत सुविधा दिसत आहेत.
17 जानेवारी रोजी उपग्रहातून टिपलेल्या छायाचित्रांमध्ये संगमजवळील स्नान घाट भाविकांनी गर्दीने भरलेले दिसत होते. त्यात संगम नदीच्या काठावर हजारो लाल, पांढरे आणि पिवळे तंबू आणि भाविकांना घेऊन जाणाऱ्या अनेक बोटी देखील दिसत आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, या कार्यक्रमासाठी 1.6 लाख तंबू आणि 50 हजार दुकाने उभारण्यात आली आहेत.
रविवारी संध्याकाळी महाकुंभमेळा परिसरात गीता प्रेस कॅम्पच्या स्वयंपाकघरातून भीषण आग लागली. आग वेगाने पसरली आणि त्यात सहा तंबू आणि 40 तात्पुरती घरे जळून खाक झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, जसप्रीत नावाचा एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात जखमी झाला.
इंडिया टुडेने त्यातील काही उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या ज्यामध्ये सेक्टर 19 परिसरातील रेल्वे पुलाजवळील गीता प्रेसची कॅम्पसाईट दिसते. आगीच्या घटनेच्या काही दिवस आधी म्हणजे 17 जानेवारी रोजी हे फोटो काढले गेले होते.
अमेरिकेतील अंतराळ कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजने घेतलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये घटनास्थळ दिसत आहे, ज्यामध्ये रेल्वे पुलाजवळील लाल तंबू आणि घरे दिसत आहेत. ही कॅम्पसाईट नदीकाठाजवळ होती.
हिंदुस्थानच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आधुनिक रडारसॅटचा वापर करून हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचे फोटो घेतले.
एनडीटीव्हीने देखील काही छायाचित्र प्रकाशित केली आहेत. ज्यामध्ये कुंभनगरी उभारण्यापूर्वीची आणि नंतरची अशी दोन्ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ज्यामध्ये तंबूंनी बनलेली कुंभनगरी, नदीवर बांधण्यात आलेले पुल दिसत आहेत.