जळगावात मोठी दुर्घटना; आगीच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेनं काहींना उडवलं

जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनबाहेर उद्या मारल्या. मात्र समोर येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने काहींना  लोकांना उडवल्याने मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात  सात जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत. तालीम अन्सारी (19), विनोद कुमार (18), प्रधान पासवान (19), विजय कुमार (30), उत्तम (30) आणि हुसेन अली (22), अशी मृतांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन जळगावहून मुंबईच्या दिशेने येत होती. यावेळी पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने आगीच्या ठिणग्या उडून चाकातून धुर आल्याचं काही प्रवाशांना दिसलं. यातच अशी अफवा फसरली की, एक्सप्रेसमध्ये आग लागली.

आगीची अफवा पसरल्याने डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. याचवेळी रुळावर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना धडक दिली, ज्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे.