राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठकारे) नेते, खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईव्हीएम विरोधात दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले.
ईव्हीएमचा वापर करून महाराष्ट्राची वाट लावली. ईव्हीएम विरोधात मारकडवाडीसह इतर गावांमध्ये जो उठाव झाला, त्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. याचा कुठे ना कुठेतरी शोध घेतला पाहिजे. दिल्लीची निवडणूक आहे. बिहारमध्ये आहे. या निवडणुकीत त्यांना पकडायचं, चोरा हा कुठे ना कुठेतरी पकडला जातोच. म्हणून आम्ही आलो. संजय राऊतसाहेब हे आमचे नेते आहेत. गेले अनेक वर्षे, अनेक दिवसांपासून ते लढाया करताहेत. जेलमध्ये सुद्धा त्यांना टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. ते ज्या हिंमतीने लढले, त्याच हिंमतीने आम्ही लढतोय. परिणामाची चिंता न करता लढतोय. आज अरविंद केजरीवालसाहेब आणि मनोज कुमार झा यांना भेटणार आहोत. चर्चा करणार आहोत. 25 जानेवारीला निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. आणि त्या दिवशी जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. निवडणूक आयोग सशक्त असला पाहिजे. तो पारदर्शकर असला पाहिजे, असे उत्तम जानकर म्हणाले.
महाराष्ट्रात ज्या पद्धतीने यांनी मतांची चोरी केली. त्यामध्ये जिंकणारे पराभूत केले आणि पराभूत होणाऱ्यांना जिंकून टाकले. जे 10-5 हजाराने पराभूत होणार होते ते लाखाच्या फरकाने निवडून आले. जे लाखाच्या फरकाने जिंकून येणार होते ते बरेचसे पराभूत झाले. आणि माझ्यासारखे काठावर जिंकले. म्हणून दिल्लीत सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही पुढचं धोरण ठरवू. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची उद्या भेट घेणार आहोत. आणि 25 तारखेला जंतरमंतरवर सत्याग्रह करू. काय घडलं महाराष्ट्रात? त्याचा डाटा संजय राऊतसाहेबांना दिला आहे. दिल्लीतील आंदोलनात कोण कोण असेल? हे आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातला उद्रेक जंतरमंतरवर आंदोलन करून लोकांसमोर आणू- संजय राऊत
ईव्हीएमचा घोटाळा करून निवडणुका जिंकणं हा राष्ट्रद्रोह आहे. पण हा घोटाळा कशा पद्धतीने झाला, होतोय आणि लोकांचा उद्रेक काय आहे, हे उत्तमराव जानकर यांच्या मारकवाडी गावानं दाखवलं. पुढच्या महिन्यात जे अधिवेशन होईल त्या काळात महाराष्ट्रातला उद्रेक आहे, तो पुन्हा एकदा जंतरमंतरवर बसून आपण आंदोलन करू आणि लोकांसमोर आणू, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.