भाजीपाला व्यापाऱ्यांवर काळाचा घाला; भरधाव ट्रक दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

भाजीपाला व्यापाऱ्यांवर भल्या पहाटे काळाने घाला घातला. भरधाव वेगातील ट्रक अनियंत्रित झाला आणि थेट दरीत कोसळला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यालापुरा महामार्गावर बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसहून अधिक व्यापारी हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथून उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमता बाजारात भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी घेऊन निघाले होते. सावनूर-हुबळी मार्गावर पहाटे चारच्या सुमारास समोरून येणार्‍या एका वाहनाला साइड देण्याच्या नादात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक 50 फूट खोल दरीत कोसळला. अपघातानंतर ट्रकच्या चिंधड्या उडाल्या. या भीषण अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावला. जखमींवर हुबळीच्या केआयएणएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व सावनूर येथील रहिवासी आहेत. फयाज इमाम साब जामखंडी (वय – 45), वसीम विरुल्लाह मुदगेरी (वय – 35), ऐजाज मुस्तका मुल्ला (वय – 20), सादिक भाषा फराश (वय – 30), गुलाम हुसेन जावली (वय – 40), इम्तियाज ममजफर मुलाकेरी (वय – 36), अल्पाज जाफर मंदक्की (वय – 25), जिलानी अब्दुल जखाती (वय – 25) आणि असलम बाबुली बेनी (वय -24) अशी मृतांची नावे आहेत.

रायचूरमध्ये तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

दरम्यान, रायचूर जिल्ह्यातील एका रस्ते अपघातात संस्कृतच्या तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. संस्कृत विद्यापीठाचे विद्यार्थी नरहरी मंदिरात पूजेसाठी जात होते. यावेळी क्रूझर वाहन कट मारण्याच्या नादात पलटी झाले आणि आर्यवंदन (वय – 18), सुचेंद्र (वय – 22) आणि अभिलाष (वय – 20) या तीन विद्यार्थ्यांचा आणि चालक शिवा (वय – 20) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.