सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मीक याआधी जवळपास 21 दिवस पोलीस कोठडीत होता.
बीडच्या मोक्का विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मीक कराड याच्या सुनावणीला सुरूवात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मीक कराड याला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) हजर केले गेले. त्या अगोदर वाल्मीक कराड याची वैद्यकीय तपासणी केली गेली. वाल्मीक कराडला सर्दी, ताप, खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने गोळ्या औषधे दिली, अशी माहिती डॉ.अमोल जोगदंड यांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे. खुनाच्या कटात संशयित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाल्मीक कराडची कोठडी मागितलेली नाही. वाल्मीक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने जामिनासाठी अर्ज करता येऊ शकतो. मात्र मकोकाचा गुन्हा दाखल असल्याने सहजासहजी जामीन मिळत नाही. साधारण सहा महिने जामीन मिळत नाही. वाल्मीक कराड याच्या वतीने त्याचे वकील जामिनासाठी अर्ज करू शकतात. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकील त्याला जामीन देऊ नये, असा प्रयत्न करतील.
वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप
केज तालुक्यातील मस्साजोग गावात अवादा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाकडे वाल्मीक आणि त्याच्या गँगने दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यातील 50 लाख रूपये निवडणूक काळात दिले गेल्याचेही आ.सुरेश धस म्हणाले. तसेच उर्वरित रक्कमेची खंडणी मागण्याकरीता ज्यावेळी वाल्मीकची गँग गेली तिथेच सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषची हत्या झाल्याचे सांगितले जाते.
खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी आणि एसआयटीमार्फत केला जात आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड तब्बल 15 दिवसांनी पोलिसासमोर आला. त्यानंतर 14 दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याच्यावर खुनाच्या कटात संशय असल्याचे कलम आणि मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार
वाल्मीक कराड आणि आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज हे खात्रीलायक पुरावा आहे. सीआयडी, एसआयटीकडे पुरावा सादर झाला आहे. कृष्णा आंधळे दोन वर्षापासून फरार असल्याचे म्हणतात. पण सीसीटीव्हीमध्ये तो दिसत आहे. तो फक्त कागदोपत्री फरार असून पोलिसांसोबत दिसत आहे. यावर उत्तर द्यावे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. तसेच वाल्मीकला न्यायालयीन कोठडी हा न्यायप्रक्रियेचा भाग असून आम्हाला न्याय मिळण्यासाठी ठोस पावलं कुठेतरी कमकूवत पडू नये, असेही ते म्हणाले.
एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाला धोका!
वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आताच द्यायला नको होती. कारण खुप मोठा तपास बाकी असून खंडणी आणि खुनातले आरोपी एकच आहेत. हे खुप मोठे षडयंत्र आहे. एकही आरोपी सुटू देऊ नका, अशी मागणीही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली. वाल्मीक कराडला सहआरोपी केले नाही तर राज्य बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला. तसेच खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. याला मुख्य आरोपी करा. यातील एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाला धोका आहे, असेही ते म्हणाले.