भाजप नेत्याला पक्षातील कार्यकर्त्यांनीच लावला 21 लाखांचा चुना; गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षातील नेत्याला त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी लाखोंचा चुना लावल्याचा प्रकार गुजरातमधील वडोदरा येथे उघडकीस आला आहे. बनावट जमीन व्यवहारातून भाजप नगरसेवक पराक्रमसिंह जडेजा यांची 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पराक्रमसिंह जडेजा यांनी वडोदरा शहर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही वेगाने सूत्र हलवत जामाजी लोढा नावाच्या एका आरोपीला अटक केली असून दिलीपसिंह गोहिल आणि कमलेष देत्रोजा या दोघांचा शोध सुरू केला आहे.

पराक्रमसिंह जडेजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी दिलीप गोहिल आणि कमलेश देत्रोजा यांनी त्यांना सुलाखीपुरा गावातील जमिनीचा एक भाग खरेदी करण्याची ऑफर दिली होती. ही जमीन कमलेश देत्रोजा यांचे काका अमृत पारेचा यांची होती. या जमीन व्यवहाराचे सर्व अधिकार आपल्याला देण्यात आले आहेत असा दावा कमलेश यांनी केला होता. 1.45 कोटींमध्ये सौदा पक्का झाला होता आणि 21 लाख रुपये टोकन म्हणून देण्यात आले होते. यातील 11 लाख कमलेश, तर 10 लाख दिलीप गोहिल यांनी घेतले.

काका अमृत पारेचा यांची तब्येत बरी नसल्याने खरेदी-विक्रीची नोंदणी त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर करू असे आरोपींनी सांगितले. यादरम्यान पराक्रमसिंह जडेजा यांना कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले. आरोपींनी नोंदणी कार्यालयात अमृत पारेचा यांच्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या जामाजी लोढा यांना आणले. कागदपत्र मिळताच काहीतरी गडबड असल्याचे पराक्रमसिंह जडेजा यांना जाणवले. अमृत पारेचा यांच्या पश्चात त्यांच्या जमिनीचा सौदा झाल्याचे लक्षात येताच पराक्रमसिंह यांनी पोलिसांना पाचारण केले.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी जामाजी लोढा यांना अटक केली असून कमलेश आणि दिलीप गोहिल यांच्या शोधासाठी दोन पथकं रवाना केल्याची माहिती, असिस्टंट पोलीस कमिशन्र जी.बी. बभानिया यांनी दिली. लोढा यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या कामासाठी आरोपींनी त्यांना 5 लाख रुपये दिले होते.

याबाबत मंगळवारी पत्रकारांशी बोलताना पराक्रमसिंह जडेजा म्हणाले की, आरोपींनी आपली चूक कबूल केली आणि पैसे परत देण्याचीही ऑपर दिली होती. मात्र हा फसवणुकीचा प्रकार असल्याने मी पोलिसात तक्रार केली. त्यांनी माझीच नाही तर जमीन मालकाचीही फसवणूक केली.