संत साहित्याचे गाढे अभ्यासक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हभप डॉ. किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र आळंदी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साखरे महाराज यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले. यावेळी मोठय़ा संख्येने त्यांचे शिष्य, भक्तगण, वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. साखरे महाराजांच्या निधनाने आळंदीत शोककळा पसरली आहे.
किसन महाराज साखरे यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 89 वर्षांचे होते. किसन महाराज साखरे यांच्या पश्चात यशोधन साखरे व चिदम्बेश्वर साखरे ही मुले आणि मुलगी यमुना साखरे, सुना, जावई, नातवंडे तसेच मोठा शिष्य व साधक विद्यार्थी परिवार आहे. आज दुपारी आळंदी येथे किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यशोधन साखरे यांनी साखरे महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी भक्त परिवार, अनुयायी शोकाकूल झाले. अनेकांना अश्रू अनावर झाले.