हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून खोपोलीच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांमार्फत हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, शुगर याची चाचणी घेतली असून वृद्धांना डॉक्टरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शनदेखील केले. रमाधाममध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच आजी-आजोबांच्या आरोग्याची काळजीदेखील शिवसेनेने घेतली आहे.
विविध भागातून आलेले आजी-आजोबा रमाधाममध्ये गुण्यागोविंदाने राहत असून त्यांची सर्व प्रकारची जबाबदारी घेण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त रमाधाममध्ये विशेष आरोग्य शिबीर भरवण्यात आले. रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या आरोग्यविषयक उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. रक्ताच्या नमुन्याची त्वरित तपासणी करून त्याचे रिपोर्टदेखील तातडीने पाठवण्यात आले आहेत.
अत्याधुनिक हेल्थ एटीएम पोर्टेबल मशीनचा उपयोग
वृद्धांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक हेल्थ एटीएम पोर्टेबल मशीनचा उपयोग करण्यात आला. या मशीनद्वारे तब्बल 60 प्रकारच्या विविध रक्तचाचण्या केल्या जातात. हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, युरिक ऑसिड, शुगर, ब्लडप्रेशर अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या असून फक्त दोन ते तीन मिनिटात त्याचे रिपोर्ट देण्यात आले. या उपक्रमासाठी डॉ. ऱहायकर, डॉ. शिंदे यांच्यासह विविध डॉक्टरांनी मोलाचे सहकार्य केले. ‘हेल्थ नोव्हो’चे संस्थापक अभय देशपांडे यांनी हेल्थ एटीएम पोर्टेबल मशीन आरोग्य तपासणीसाठी आणले. यापुढेदेखील आजी-आजोबांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य यांनी सांगितले.