कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडलेल्या ‘त्या’ व्यक्तीची हत्याच

रविवारी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या 42 वर्षीय व्यक्तीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय अहवालातून ही बाब समोर आली असून पोलिसांनी त्यानुसार हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

राजेश सारवण (42) असे त्या मृत व्यक्तीचे नाव होते. तो चकाला रोड परिसरात राहत होता. रविवारी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात राजेशचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतकाच्या  डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.