खोटी माहिती दिली त्या बहिणींकडून पैसे परत घेणार – आदिती तटकरे

खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱयांचे पैसे महायुती सरकार परत घेणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तसे जाहिररित्या सांगितले आहे. पैसे परत घेण्याची प्रक्रियाही त्यांनी सांगितली. त्यामुळे महायुतीला बहुमत देणाऱया लाडक्या बहिणींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारने महिलांकडून अर्ज भरून घेतले. अर्जांमधील माहितीची कोणतीही पडताळणी न करता निवडणुकीवर डोळा ठेवून सरसकट सर्वांना योजनेचे पैसे देण्यास सुरुवात झाली. आता सत्तेवर आल्यानंतर अर्जांची छाननी केली जात आहे. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘आतापर्यंत चार हजार महिलांनी स्वत: पुढे येऊन या योजनेचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले आहे. इतर अर्जांचीही पडताळणी सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

खोटय़ा भूलथापा देऊन महायुतीने मिळवलेली मतेही परत द्या!

आदिती तटकरे यांच्या वक्तव्याचे वृत्त सोशल मिडियावर झळकल्यानंतर नेटकऱयांच्या त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लाडक्या बहिणींचे पैसे परत घेताय मग खोटय़ा भूलथापा देऊन महायुतीने मिळवलेली त्यांची मतेही परत द्या! असे नेटकरी म्हणत आहेत.

चलनाच्या माध्यमातून पैसे तिजोरीत येणार

ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले आहेत ते सरकारी चलनच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत येतील. यासाठी अर्थ-नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे. रिफंड हेड तयार करून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जातील. इतर योजनांमध्ये जशी नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथेदेखील सुरू होईल, असे आदिती तटकरे म्हणाल्या.