दावोसमध्ये पहिल्याच दिवशी पाच लाख कोटींचे करार; मोठ्या कंपन्या नागपूर, गडचिरोलीला पळवल्या

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे विविध कंपन्यांबरोबर पाच लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून त्यातून 92 हजार रोजगारनिर्मिती होईल, असा दावा आज महायुती सरकारकडून करण्यात आला. हे करार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वार्थ दिसून आला आहे. 50 टक्क्यांहून अधिक म्हणजे 3 लाख कोटींचे करार करणाऱ्या कंपन्या त्यांनी नागपूर आणि गडचिरोलीत पळवल्या आहेत.

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सोमवारी रात्री उद्घाटन झाले. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. सर्वात मोठा 3 लाख कोटींचा करार नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यू कंपनीसोबत करण्यात आला आहे. गडचिरोलीसाठी कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. 5200 कोटी गुंतवणुकीचा हा करार असून त्यातून चार हजार रोजगारांची निर्मिती होईल असे सांगण्यात आले.