Ind Vs Eng विजयी सातत्याच्या धमाक्यासाठी सज्ज, जगज्जेता हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात आज पहिला टी-20 सामना

गेल्या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये जगज्जेतेपदाच्या धमाक्यासह मालिका विजयाचे सातत्य राखणारा जगज्जेता हिंदुस्थानचा संघ वर्षभरातील पहिल्या टी-20 सामन्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाला आहे. 2024 साली यशाचे जे सर्वोच्च शिखर गाठले होते ते कायम राखण्यासाठी हिंदुस्थानी संघ ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर आपला सलामीचा सामना आज (बुधवारी) खेळणार आहे. नववर्षाचा प्रारंभ विजयासह करण्याचे ध्येय सूर्यकुमार यादवच्या संघाने समोर ठेवले असले तरी इंग्लंडच्या जोस बटलरचा आक्रमक संघही हिंदुस्थानचे कडवे आव्हान मोडीत काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवर षटकार-चौकारांची आतषबाजी पाहायला मिळणार हे निश्चित आहे.

गेल्या वर्षी टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करताना विंडीज-अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आठ नॉनस्टॉप विजयासह जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेत हिंदुस्थानला कुणीही हरवू शकला नव्हता. तसेच गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या पाच मालिकांमध्येही हिंदुस्थानने विजय मिळवत आपले मालिका विजयांचे सातत्य अबाधित राखले होते. हिंदुस्थानचा संघ इतक्या जबरदस्त फॉर्मात होता की, 28 सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांतच हरला होता आणि 23 सामने जिंकला होता. दोन सामने बरोबरीत सुटले होते, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या दिमाखदार कामगिरीनंतर सूर्याचा तेजस्वी संघ पुन्हा एकदा आपल्या खेळाचे तेज दाखवण्यासाठी सज्ज आहे.

सूर्याला वगळल्याचे दुःख नाही

सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार असला तरी वन डे क्रिकेटमधील अपयशामुळे त्याला आगामी आयसीसी चॅम्पियन्स करंडकासाठी हिंदुस्थानी संघातून वगळण्यात आले आहे. सूर्याला या घटनेबाबत जराही खेद नाही. हिंदुस्थानचा संघ बलाढय़ आहे. मलाही लवकर संघात पुनरागमन करायला आवडेल, असे सूर्या म्हणाला. तसेच हार्दिक पंडय़ाऐवजी अक्षर पटेलला उपकर्णधार केल्याबद्दलही तो म्हणाला, या निर्णयामुळे दोघांच्याही कामगिरीवर कसलाही वाईट परिणाम होणार नाहीय. हार्दिक हा माझा चांगला मित्र आहे आणि तो संघासाठी आपली सर्वोत्तम कामगिरीच करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

टी-20 चा चॅम्पियन्स करंडकासाठी फायदाच

पुढील महिन्यात चॅम्पियन्स करंडक होतोय आणि आता टी-20 मालिका. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाच्या तयारीवर कसलाही फरक पडणार नाही. उलट आम्हाला याचा फायदाच होणार आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाला आपल्या बॅझबॉल खेळाने वेगळय़ा उंचीवर नेणारे प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलम आता टी-20, वन डे क्रिकेटचेही प्रशिक्षक झाले आहेत. त्यांच्याशी मी योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे इंग्लिश कर्णधार जोस बटलर म्हणाला. कधी-कधी आम्ही इतके क्रिकेट खेळतो की, आमच्या काही खेळाडूंना विश्रांती द्यावी लागते. पण आता आमचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरतोय. त्यामुळे टी-20 आणि वन डे फॉरमॅटमध्ये थरारक खेळ पाहायला मिळणार याची खात्री बटलरने दिली.

पहिल्या टी-20 साठी उभय संघ

हिंदुस्थान संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पंडय़ा, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, वरुण चक्रवर्थी.

इंग्लंड संघ – बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथल, जॅमी ओव्हर्टन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल राशीद, मार्क वूड.

तिलक वर्माला हॅटट्रिकची संधी

गेल्या वर्षाचा शेवट तिलक वर्माने अत्यंत स्पह्टक केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्पंत त्याने 107 आणि 120 अशा सलग दोन नाबाद शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला होता. आता त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शतकांच्या हॅटट्रिकचा नवा आणि अनोखा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. आजवर एकाही फलंदाजाला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. तसेच गेल्या वर्षी त्याने या दोन घणाघाती शतकानंतर सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या मेघालयविरुद्धच्या सामन्यातही त्याने हैदराबादसाठी 67 चेंडूंत 151 धावांची घणाघाती खेळी साकारत टी-20 क्रिकेटमध्ये शतकाची हॅटट्रिक साकारली होती. बुधवारी इंग्लंडविरुद्धही त्याची बॅट तळपली आणि त्याने शतक ठोकले तर तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये शतकांची हॅटट्रिक करणारा पहिला फलंदाज ठरेल तर टी-20 क्रिकेटमध्ये शतकांचा चौकार साकारणाराही पहिला फलंदाज असेल. असे दोन्ही अद्वितीय पराक्रम तिलकच्या नावावर नोंदवले जातील. त्यामुळे तिलक वर्माच्या झंझावाताकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असेल.