प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा सुरू राहील. प्रयागराज येथे दाखल झालेले साधूसंत आपली अनोखी साधना आणि वेशभूषेमुळे चर्चेत आहेत. महंत देवगिरीजी महाराज त्यापैकीच एक. रबडीवाले बाबा या नावाने ते लोकप्रिय आहेत. गुजरात येथून आलेले महंत देवगिरी महाराज बाबा आपल्या शिबिराबाहेर एका कढईत रबडी बनवतात. बाबा स्वतः रबडी बनवून आपल्या शिबिरात येणाऱया भाविकांना प्रसाद म्हणून वाटतात.
महंत देविगिरीजी महाराज यांनी महाकुंभमध्ये 9 डिसेंबरपासून रबडी बनवण्यास सुरुवात केली. ते 6 फेब्रुवारीपर्यंत हे काम करतील. देवदेवतांना नैवेद्य दाखवल्यानंतर साधूसंतांना रबडीचा प्रसाद दिला जातो. दिवसाला साधारण 150 लिटर दुधाची रबडी तयार केली जाते. महंत देविगिरीजी महाराज यांनी वयाच्या पाचव्या वर्षी संन्यास घेतला होता. आज ते 53 वर्षांचे आहेत. त्यांचा हा पाचवा कुंभमेळा आहे. त्यांच्या नावावर जमीन असून ते स्वतः शेतात काम करतात आणि स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करतात. कुणावर मदतीसाठी अवलंबून राहत नाहीत.