एआय तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेही अधोरेखित होत आहेत. अशातच एका व्यक्तीने दावा केलाय की, एआय चॅटबॉट म्हणजे ‘चॅट जीपीटी’ने त्याला गंभीर आजार झाल्याचे सांगितले आणि त्याचा जीव वाचवला. ‘चॅट जीपीटी’ने प्राण वाचल्याचा दावा करताना, त्या व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलंय, ‘जवळपास एक आठवडय़ाआधी मी एक्सरसाईज करण्याचा निर्णय घेतला, पण मला आजारी असल्यासारखं वाटू लागतं. मी केवळ पुशअप्स, स्क्वॅट आणि प्लॅक एक्सरसाईज केल्या होत्या. थोडी जास्त कॉफी प्यायलो होतो. मला दोन दिवस बरे वाटत नव्हते. आजारी वाटत होते.’ त्यानंतर संबंधित व्यक्तीने कोणत्या आजाराची लक्षणे आहेत, हे जाणून घेण्यासाठी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने चॅट जीटीपीची मदत घेतली. जेव्हा व्यक्तीने चॅट जीपीटीला समस्या सांगितली तेव्हा तो हैराण झाला. कारण त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला मिळाला.
…अन् पुढील अनर्थ टळला
चॅट जीपीटीने त्या व्यक्तीला ‘रॅबडोमायोलिसीस’ने ग्रस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर ती व्यक्ती लगेच हॉस्पिटलमध्ये गेली आणि टेस्ट केल्यावर समजलं की, त्याला गंभीर रॅबडोमायोलिसीस आजार झाला आहे. हा आजार तेव्हा होतो जेव्हा मांसपेशी वेगानं तुटू लागतात आणि प्रोटीन किडनीमध्ये अडथळा निर्माण करतं. डॉक्टरांच्या आधी त्याच्या आजाराबद्दल चॅट जीपीटीने अलर्ट दिला. त्यामुळे पुढील अनर्थ होण्यापासून टळला.