धडाम! शेअर बाजारात अ‘मंगल’वार गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी स्वाहा

हिंदुस्थानी शेअर बाजारात मंगळवारी हाहाकार उडाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त घसरगुंडी पाहायला मिळाली. एक टक्क्याहून अधिक घसरण यात दिसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1235 अंकांनी घसरून 75,838 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 320 अंकांची डुबकी मारून 23,024 अंकांवर बंद झाला. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना टार्गेट करत एक विधान केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील, चीन, रशिया, साऊथ आफ्रिका आणि हिंदुस्थान या देशांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी सोमवारी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेताच हे स्पष्ट केले की, जर कोणताही ब्रिक्स देश… डीडॉलरयझेशन म्हणजेच डॉलरवर आपले अवलंबून राहणे कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या देशाला 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल. ट्रम्प यांच्या वक्तव्याचा परिणाम हिंदुस्थानवरसुद्धा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांनी पॅनडा आणि मेक्सिकोहून येणाऱया सामानांवर फेब्रुवारीपासून 25 टक्के टॅरिफ (आयात मालांवर जकात) लावणार असल्याची घोषणा केली.