ठाणे महापालिकेने कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचे टेंडर काढल्याचे समोर आले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्त व राज्य सरकारला काही प्रश्न केले आहेत. आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत महापालिका आयुक्तांना व राज्य सरकारला या टेंडरवरून फटकारले आहे.
”ठाणे महानगर पालिकेत कचरा उचलण्यासाठी 2300 कोटीचे एक टेंडर निघतेय अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मला प्रश्न एवढा आहे की टेंडर काढा पण जमा केलेला कचरा टाकणार कुठे ते सांगा? आम्ही बोंबलतोय की डंम्पिंग ग्राऊंड कुठेय? या महापालिकेला स्वत:च डंम्पिंग ग्राऊंड करता नाही आलं. पंतप्रधान सांगतात की प्रत्येक घरात शौचालय असायला हवं. पण या शहराला शौचालयच नाही. महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की शहराचा कचरा तुम्ही कुठे टाकता? कधी याच्या शेतात टाक कधी त्याच्या शेतात टाक. हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी आयुक्तांना जेल मध्ये जावं लागेल. महापालिका आयुक्त लेखाजोगा तपासा तुमच्याकडे शंभर कोटी तरी आहेत का अधिकचे. काय चाललं आहे, काय हा पैशाचा तमाशा लावला आहे. कुठून आणणार आहात पैसे. आज या शहारत पाणी नाही प्यायला. या शहराला कधीच धरण हवं होतं. आजही आपण भीक मागतोय. विधानसभेत आपण भाषणं केली तर समोर बसलेले मंत्रीमहोदय टिंगल टवाळी करण्याशिवाय काही करत नाही. ठाणेकराच्या नळाला पाणी येत नाही. आहे का याच्यावर तुमच्याकडे उत्तर? असले हे पैसे उधळण्याचे जे शौक आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ नका. हा एक स्कॅम आहे. हे 2300 रुपये कचरा नाही पैशाची वाहतूक करण्यासाठी आहे. पाणी नाही त्यावर कधीतरी बोलावं. पाणी नाही म्हणून आमच्या आया बहिणी रडतायत. आज तुम्ही सत्ताधीश आहात. तुम्ही शिस्तप्रिय व कर्तव्यप्रिय म्हणून तुमची ओळख आहे. आताच या मालमसाल्यात फसू नका. कचऱ्याचे टेंडर त्वरीत रद्द करा. ठाण्यातील जनतेचे पैसे झाडाला उगवत नाही, आम्हाा पाणीही हवं आहे आम्हाला रस्तेही हवे आहेत आणि डंम्पिंग ग्राउंडही हवे आहे, असे आव्हाड यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.