अमित शहा यांच्या आशिर्वादाने मिंधे गटाचा पक्ष चाललाय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अमित शहा तुमच्यासोबत आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी यावेळी केला.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदांची घोषणा केली आणि उदय सामंत यांच्यासोबत दावोसला गेले. एकनाथ शिंदे यांची नाराजी त्यासंदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. भाजपकडे बहुमत असताना मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात हे आश्चर्य आहे. एरवी कडक असणारे आणि बेशिस्त सहन न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांच्या निर्णयावर स्थगिती देण्याची वेळ का आली? पालकमंत्रीपदासाठी एवढा हावरटपणा का? आपण मंत्री आहात आणि आपण संपूर्ण राज्याचे काम करत आहात. एखादा मंत्री संपूर्ण राज्याचा असतो, तो जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा असतो का? अजिबात नाही. पण पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे, ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे फार मोठे बजेट आहे, म्हणून कुणालातरी नाशिकचे पालकमंत्रीपद हवे आहे. रायगड जिल्हा हा सधन जिल्हा आहे, उद्योग आहेत, त्यातले सर्व व्यवहार लोकांना माहित आहे. त्यांना छळून जास्तीत जास्त खंडण्या कशा काढता येतील, असा एक हिशोब तिथे नेहमी असतो. त्यामुळे या आर्थिक देवाण घेवाणीतून या मारामाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेऊन मी एक हतबल, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिले आहे. केंद्राने या निर्णयात हस्तक्षेप केला असेल तर दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला असेल. महाराष्ट्रातून दिल्लीचे सरकार चालवलं जात आहे असे आम्ही म्हणतोय. मग फडणवीस, शिंदे किंवा अजित पवार असो, हे कळसूत्री बाहुले असून त्यांचे दोरे दिल्लीतून नाचवले जातात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. मुख्यमंत्री निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात, मुख्यमंत्री हे गुंडांच्या विरोधात निर्णय घेत आहेत आणि दिल्ली रस्त्यावर उतरून दंगली करणाऱ्यांच्या बाजूने आहे. पालकमंत्रीपदासाठी दंगल हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं असे संजय राऊत म्हणाले.
तसेच महाराष्ट्रातून दिल्लीला सर्वात जास्त कोण थैल्या देतंय त्याच्यावर त्या नेत्याचं दिल्लीत वजन ठरतंय असे संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंचं ज्या अर्थी ऐकलं गेलंय, त्या अर्थी आम्ही जे ऐकतोय ते खरं आहे. की कधी नव्हे ते थैल्यांचा व्यापार महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात झालेला आहे. आणि झारखंडपासून अनेक निवडणुकांचा खर्च हा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची जी किंमत असेल तर ती मिळत असेल असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
उदय सामंत म्हणाले की राजकीय भुकंप होणार 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते आमदार शिंदे गटाचे आहेत असे संजय राऊत म्हणाले. राहुल शेवाळे काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. आम्ही शेवाळेंचा दारूण पराभव केला. तुमचा पक्ष भविष्यात टिकतो की नाही ते बघा. जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंतच तुमचा पक्ष टिकेल. त्यानंतर कुणालाही भविष्य आणि भवितव्य नाही. मिंधे गटातील लोकांचे लटकते आणि भटकते आत्मे होणार आहेत. अमित शहांचा आशिर्वाद आहे म्हणून निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे. अमित शहा तुमच्यासोबत आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे. अजून काय आहे तुमच्याकडे, प्रचंड पैसा असल्याने तुम्ही निवडणूका जिंकत आहे. बाकी तुमची विचारधारा काय आहे तुमचा पक्ष काय आहे लोकं, मतदार विकत घ्यायचे. सगळ्या संस्था विकत घ्यायच्या आणि निवडणुका लढवायच्या. हे सर्व अमित शहांच्या करंगळीवर उभं असलेलं पाप आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.