पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर घडवून आणल्याचे सत्य आधीच सांगितले होते

बदलापूर येथे ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती शाळा भाजपशी संबधित होती. त्यामुळे संस्था चालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांना सांगून एन्काऊंटर करण्यात आल्याचा खळबळनजक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आरोपी शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या नाही तर त्याला पोलिसांनी मारले, हे आपण आधीच सांगितले होते, असा दावाही देशमुख यांनी केला. पोलिसांच्याजवळ असलेले रिवॉल्व्हर काढून कोणी गोळ्या झाडू शकत नाही. ते लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आपण केली होती. आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायदंडाधिकाऱ्याच्या निष्कर्षावरून दिसते, असेही देशमुख  म्हणाले.

पोलिसांएवढेच शिंदेफडणवीस जबाबदार वडेट्टीवार

या एन्काउंटरची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे तेवढीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.  ‘एकनाथचा एक न्याय’ आणि ‘देवाभाऊचा न्याय’ म्हणून स्वतःला हीरो बनवून घेण्यासाठी या एन्काउंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे, अशी तोफ त्यांनी डागली.