अमेरिकेत आता सुवर्णयुगाला सुरुवात झाली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यपदाची शपथ घेताच ट्रम्प यांनी पुन्हा भाषण केले. ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या हल्ल्याचा उल्लेख करत देवानेच मला अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवण्यासाठी वाचवले असे ट्रम्प म्हणाले. पदभार स्वीकारल्यानंतर पुढील काही तासांमध्ये अनेक आदेशांवर स्वाक्षऱ्या करणार असल्याचे ट्रम्प यांनी शपथविधीपूर्व आयोजित सोहळ्यात सांगितले होते. दरम्यान, सोहळ्याला हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश आणि अंबानी दाम्पत्याने हजेरी लावली.
अंबानी दाम्पत्याने ट्रम्प यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यात संवादही झाला. शपथविधी सोहळ्याला मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि एलॉन मस्क यांचीही खास उपस्थिती होती.
अभिनंदन मित्रा– नरेंद्र मोदी
अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा! अशा शब्दांत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक्सवरून शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांच्या हितासाठी आणि जगाला उत्तम भविष्य देण्यासाठी मी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा! अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.