रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला अचानक दिलेल्या स्थगितीवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. महायुतीतील स्वार्थी, हावरट नेते पालकमंत्री पदासाठी भांडताहेत अशी टीका करतानाच, कुणासमोरही न झुकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ईव्हीएमचे संख्याबळ असतानाही मिंध्यांच्या दादागिरीसमोर झुकले कसे, असा बोचरा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद बोलवून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला महायुती सरकारने अवघ्या चोवीस तासांत दिलेली स्थगिती आणि सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याच्या मुद्दय़ावरून आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्य आणि पेंद्र सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस परदेशात असताना रविवारी मध्यरात्री रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला अचानक स्थगिती दिली गेली. या दोन जिह्यांचे पालकमंत्री नेमले गेले त्यांचा हा अपमान आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महायुतीला बहुमत मिळूनही सुरुवातीला सरकार स्थापन होण्यासाठी वेळ गेला. त्यानंतर खातेवाटप करण्यासाठी वेळ गेला. आता पालकमंत्रिपदांचे वाटप झाल्यावर पुन्हा धुसफुस समोर आली आहे. ज्यांच्या काळात एसटीचा घोटाळा झाला त्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने त्यांच्या चेल्यांकडून नाराज होऊन रस्त्यांवर टायर जाळले गेले. मंत्रिपदांसाठीही असाच हावरटपणा झाला होता, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर शरसंधान केले. जॅकेट शिवून ठेवले असेल, पण प्रत्येक वेळी जॅकेट घालायचेच असे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
यांना मालकमंत्री व्हायचेय
सह-पालकमंत्री नेमण्याच्या मुद्दय़ावरून आदित्य ठाकरे यांनी या वेळी पुन्हा एकदा महायुतीवर टीका केली. पालकमंत्री पद देता न आल्याने सह-पालकमंत्री पद दिले, यांना पालकमंत्री नव्हे, तर त्या जिह्याचे मालकमंत्री व्हायचेय, असा टोला त्यांनी हाणला. पालकमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेल्याचे माध्यमांनी या वेळी विचारले असता, आज चंद्र कुठे दिसतोय का बघा, अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली.
जाळपोळ करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका
रायगड जिह्यात गोगावले यांच्या समर्थकांनी केलेल्या जाळपोळीवरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमधील जनता न्याय मागतेय, पण त्यांना न्याय द्यायला मुख्यमंत्री गेले नाहीत. जाळपोळ करणाऱ्यांसाठी मात्र तातडीने स्थगिती दिली गेली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवे की त्यांचा हट्ट पुरवायला हवा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.