इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष अखेर 19 जानेवारीला थांबला. युद्धविरामाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलने 90 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. या बदल्यात हमासने तीन इस्रायली महिला ओलिसांची सुटका केली. रोमी गोवेन, एमिली डमारी आणि डोरोन स्टेनब्रेचर अशी या तीन महिलांची नावे आहेत. रेड क्रॉसच्या मदतीने तिन्ही ओलिसांना इस्रायलमध्ये परत आणण्यात आले. या तिघी घरी परतल्यानंतर आप्तेष्ट, नातेवाईकांच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळले. एकमेकांना घट्ट मिठी मारत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेनंतर गाझापट्टीसह इस्रायलमध्ये सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इस्रायलच्या कडक नाकाबंदीदरम्यान 600 हून अधिक ट्रक मानवतावादी दृष्टिकोनातून जीवनावश्यक वस्तूंची मदत घेऊन गाझाला पोहोचले. युद्धग्रस्त भागातून पॅलेस्टिनी नागरिक त्यांच्या घरांची पाहणी करण्यासाठी आणि नातेवाईकांना दफन करण्यासाठी परतत आहेत.
गरज पडल्यास हमासशी पुन्हा युद्ध
युद्धविरामासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दबाव आणला होता, परंतु गरज पडल्यास हमासविरोधात पुन्हा युद्ध छेडण्याची हमी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मिळाल्याचा दावाही नेतन्याहू यांनी केला आहे.
आनंद आणि दुःखही
इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या युद्धात 46 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. त्याचबरोबर इस्रायली नागरिक आणि सैनिकांचाही मोठय़ा संख्येने मृत्यू झाला. कुणाचा मुलगा, पत्नी, मुलगी, पती युद्धाला बळी पडले. त्यामुळे युद्धविरामादरम्यान विस्थापित झालेले पॅलेस्टिनी घरी परतू लागले असले तरीही सर्वत्र आनंद आणि दुःख असे चित्र होते.
संपूर्ण राष्ट्र तुम्हाला मिठी मारत आहे –नेतन्याहू
इस्रायली ओलीस महिलांची सुटका झाल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना, आप्तेष्टांना अक्षरशः कडकडून मिठी मारली. याबाबतचे व्हिडीओ इस्रायली सरकारने जारी केले आहेत, तर पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी संपूर्ण राष्ट्र तुम्हाला मिठी मारत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 33 ओलिसांकैकी डमरी, गोनेन आणि स्टेनब्रेचर या तीन महिलांना सुरुवातीच्या टप्प्यात सोडण्यात आले, तर इस्रायल तीन टप्प्यांत एकूण 2 हजार पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार असून गाझापट्टीत इंधनासह आवश्यक वस्तू पाठवणार आहे. दरम्यान, या करारानंतर आणखी ओलीस आणि कैद्यांची सुटका तसेच कायमच्या युद्धविरामासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.