शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे दीड तास त्यांनी राजकीय, सामाजिक अशा विविध विषयांवर चर्चा केली. महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीबरोबरच मुंबईत होणाऱया जनआक्रोश मोर्चाबाबत यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची रणनीती तसेच 25 जानेवारी रोजी संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी मुंबईत आयोजित जनआक्रोश मोर्चाबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
महाविकास आघाडी ठणठणीत
महाविकास आघाडी ठणठणीत आहे. काहीही चिंता करू नका. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, विधानसभेला एकत्र लढलो. काही चुका झाल्या असतील त्या भविष्यात दुरूस्त करू. आमच्यामध्ये संवाद राहिला पाहिजे. तो संवाद आता सुरू झालेला आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
वानखेडेच्या अर्धशतकी वाटचालीचे कॉफी टेबल बुक आणि टपाल तिकीट भेट
वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव नुकताच मोठय़ा थाटामाटात पार पडला. वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीपासून नंतरच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा इतिहास सांगणाऱया कॉफीटेबल बुकची निर्मिती या सुवर्ण महोत्सवानिमित्त करण्यात आली आहे. आयसीसीचे माजी अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हिंदुस्थानचे जागतिक ख्यातीचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी हे कॉफीटेबल बुक आणि वानखेडे स्टेडियमवर काढण्यात आलेले टपाल तिकिट उद्धव ठाकरे यांना भेट दिले. त्याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते. वानखेडेवरील ऐतिहासिक सामने आणि क्रिकेटच्या जुन्या आठवणींनाही सर्वांनी उजाळा दिला. गावसकर यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रिकेटप्रेमाचा यावेळी आवर्जून उल्लेख केला.