हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शीव प्रतीक्षानगरमध्ये लावण्यात आलेले शुभेच्छांचे बॅनर पालिका प्रशासनाने मुजोरपणे काढल्याचा प्रकार घडल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. शिवसैनिकांनी या ठिकाणी ठिय्या मांडून पालिका प्रशासनाचा निषेध केला. शिवसैनिकांनी हिसका दाखवताच शरणागती पत्करत पालिकेच्या मुजोर अधिकाऱयाने घटनास्थळी येऊन माफी मागितली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारीचा जन्मदिवस म्हणजे मुंबईसह अखंड महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. आपल्या लाडक्या नेत्याच्या जन्मदिनानिमित्त अनेक दिवस समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर शीव प्रतीक्षानगर येथे शिवसेनेच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती रहिवाशांना व्हावी आणि त्याचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी शिवसेनाप्रमुखांना शुभेच्छा देणारे होर्डिंग शिवसेना शाखा क्र. 173 येथे सोमवारी लावण्यात आले, मात्र पालिकेच्या एफ/उत्तर विभागातील अधिकारी अविनाश घारे यांनी आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शिवसेनाप्रमुखांचे होर्डिंग काढले. विशेष म्हणजे ही कारवाई करताना होर्डिंग फाडले गेले. त्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. याच संतापातून शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार आंदोलन केले.
यावेळी शिव कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विभाग संघटीका पद्मावती शिंदे, विधानसभा संघटक गजानन पाटील, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, राजेश कुचिक, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख प्रशांत जाधव, संजय म्हात्रे, विनोद मोरे, संजय कदम, प्रकाश हसबे, सचिन खेडेकर, समाधान जुगदर, महिला शाखा संघटक कल्पना खणकर, नंदा साहू, ग्राहक संरक्षण कक्षाचे सुशील सुनकी, युवा सेना शाखा अधिकारी शुभम जाधव, सचिन पडवळ, हर्षदा पाटील यांच्यासह शेकडोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तिरंगा आणि शिवसेनाप्रमुखांचा अवमान खपवून घेणार नाही
पालिकेने कारवाई करताना तिरंगा आणि शिवसेनाप्रमुखांचा फोटो असणारे होर्डिंग खेचून काढले. यामुळे तिरंग्याचाही अवमान झाला. हे होर्डिंग नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून काढले, असा सवाल करताना त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी तिरंगा आणि शिवसेनाप्रमुखांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशारा पालिका प्रशासनाला दिला. शिवाय जोपर्यंत होर्डिंग हटवणाऱया अधिकाऱयाचे निलंबन केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला.
सत्ताधाऱ्यांना अभय; शिवसेनेच्या होर्डिंगवर कारवाई
याच परिसरात सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे मोठमोठे होर्डिंग बेकायदेशीरपणे झळकत आहेत. शिवाय फुटपाथवर प्रचंड प्रमाणात हातगाडय़ा लावण्यात येत असल्याने रहिवाशांना चालणेही मुश्कील झाले आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार केली असताना कोणतीही दखल घेतली जात नाही. मात्र शिवसेनेने लावलेल्या होर्डिंगवर तातडीने कारवाई केली जाते, असा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला.
पालिका अधिकाऱयाची शरणागती
आपल्या लाडक्या नेत्याच्या अवमानामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी घटनेचा तीव्र निषेध करीत जोपर्यंत पालिका अधिकारी माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केल्याने पालिका प्रशासन हादरले. शिवसैनिकांचा संताप पाहून अखेर पालिका अधिकारी अविनाश घारे याने घटनास्थळी दाखल होत शिवसेनेची सपशेल माफी मागितली. हा प्रकार अनावधानाने झाल्याचे सांगत अशी चूक पुन्हा होणार नाही अशी शरणागती पत्करली. त्यामुळे रात्री उशिरा शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले.