विराट तब्बल 12 वर्षांनंतर रणजीच्या मैदानात, 30 जानेवारीला रेल्वेविरुद्ध खेळणार

ऑस्ट्रेलियातील दारुण अपयशानंतर हिंदुस्थानी संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपला फॉर्म मिळवण्यासाठी रणजी खेळावे, असा सल्ला अनेक दिग्गजांनी दिला होता. अखेर विराट कोहलीने आपण 30 जानेवारीला दिल्लीसाठी रेल्वेविरुद्धचा रणजी सामना खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर विराटची पावले रणजी क्रिकेटच्या मैदानात पडणार आहेत.

2012 नंतर कोहली एकही रणजी किंवा देशांतर्गत क्रिकेट खेळला नव्हता. मात्र आता तो 12 वर्षांनंतर रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. येत्या 23 तारखेपासून रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला सुरुवात होत आहे. दिल्लीचा सलामीचा सामना 23 जानेवारीला सौराष्ट्रसोबत होणार आहे. मात्र, मानेच्या दुखापतीमुळे विराटने या सामन्यातून माघार घेतली आहे, पण तो साखळी फेरीतील दुसऱया सामन्यातून रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. विराट दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या संपका&त असून त्याने रेल्वेविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. त्याने डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांना याबाबत माहिती दिली आहे.

खेळापेक्षा कुणी मोठं नाही -योगराज सिंह

खेळापेक्षा कुणी मोठा नाही. डॉन ब्रॅडमन असो किंवा विव्ह रिचर्ड्स, तेसुद्धा कधी खेळापेक्षा मोठे नव्हते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी काहीही खेळत नसलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्माने रणजी स्पर्धेत खेळावे, असा आग्रह माजी कसोटीपटू योगराज सिंह यांनी केला आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जो खेळाडू राष्ट्रीय संघात नसेल त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर कोहली आणि शर्माने आपल्या रणजी सहभागाबाबत अद्याप काहीही कळवलेले नाही. त्यामुळे योगराज म्हणाले, तुम्ही कधीही खेळापेक्षा मोठे होऊ शकत नाही. ना कधी ब्रॅडमन होते ना कधी रिचर्डस् आणि ना कुणी मोठा होऊ शकत. त्यामुळे तुम्ही आता देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात करायला हवी. जेव्हा एखादा कसोटीपटू देशांतर्गत क्रिकेट खेळतो तेव्हा त्याच्यासोबत खेळणाऱया अन्य युवा खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावतो. युवराजसुद्धा संघातून बाहेर झाल्यावर देशांतर्गत सामने आवर्जून खेळायचा. तसेच जेव्हा संघ काहीही खेळत नसेल तेव्हा दिग्गजांनी देशांतर्गत सामन्यांनाही वेळ द्यायला हवा. खेळाडूंसाठी एक फिटनेस शिबिराचेही आयोजन करायला हवे. नेट्सवर काही होत नाही. सर्व सेंटरमध्ये होते.