>> मंगेश वरवडेकर
आपला मऱ्हाटमोळा खो-खो देशाच्या कानाकोपऱ्यात खेळला जावा, जगभरात खो-खोची चपळता पोहोचावी यासाठी आजवर अनेक खो-खो संघटकांनी, खो-खोपटूंनी आपल्या जिवाचे रान केलेय, अथक परिश्रम केलेत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचेच आज चीज झालेय. आम्ही जे पहिलेवहिले जगज्जेतेपद जिंकून खो-खोवर हिंदुस्थानचीच सत्ता असल्याचे दाखवून दिलेय, ते त्यांच्याच परिश्रमाचे फळ आहे. त्यांनी पाहिलेले स्वप्न आमच्याकरवी साकार झालंय. त्यामुळे खो-खोचे हे जगज्जेतेपद खो-खोच्या त्याच दिग्गजांना अर्पण, अशी कृतज्ञता व्यक्त केलीय हिंदुस्थानी खो-खो संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरने.
खो-खोचे जगज्जेतेपद जिंकल्यानंतर प्रतीक वाईकरच्या डोळय़ात आनंदाश्रू होते. तो जगज्जेतेपदाबद्दल भरभरून बोलला. तो म्हणाला, खो-खोत हिंदुस्थानी संघ बलवान आहे, हे कुणापासूनही लपलेले नव्हते. पहिल्या जगज्जेतेपदाची हिंदुस्थानलाच सर्वाधिक संधी होती आणि आम्ही त्या संधीचं सोनं केले, पण नेपाळ, बांगलादेश या आशियाई संघांसह दक्षिण आफ्रिकेने केलेला खेळ काwतुकास्पद आहे. खो-खो चपळ आणि बुद्धीचा खेळ असूनही आमच्या खेळाला योग्य मार्ग सापडत नव्हता. खरं सांगायचं तर आमच्या खेळाला सारेच मागासवर्गीय मानत होते. आमच्या खेळाला आणि खेळाडूंना क्रीडा जगतात अपेक्षित मान नव्हता. देश पातळीवर असो किंवा स्थानिक पातळीवर, कुणी फारशा स्पर्धाही घेत नव्हता, मात्र खो-खो विश्वचषकाच्या आयोजनानंतर खो-खोचे जग बदललेय. कारण आता खो-खोने जग जिंकलेय.
खो-खोला आणखी वेगवान करणार
खो-खो खेळच मुळात वेगवान आहे. त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार वेगवान करण्याचाही माझा मानस आहे. विश्वचषकानंतर तो राज्याच्या प्रत्येक जिह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात खेळला जावा, यासाठी मी राज्य खो-खो संघटनेच्या साथीने पुढाकार घेईन. जे आजवर घडलं नव्हतं, ते भविष्यात खो-खोसाठी केलं जावं म्हणून प्रयत्न करीन. आम्ही जे काही आहोत, ते फक्त आणि फक्त खो-खोमुळेच आहोत. खो-खोच्या जगज्जेतेपदामुळे आमच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होईल. त्यामुळे आम्हीही खो-खोला काही देणं लागतो. त्यामुळे आम्हाला खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी आर्थिक सहकार्य करावे लागले तरी आम्ही मागे हटणार नसल्याची भावना प्रतीक वाईकरने बोलून दाखवली.
आता राष्ट्रकुल, ऑलिम्पिक दूर नाही…
गेल्या पाच-सहा वर्षांत खो-खो संघटकांनी खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी घेतलेली मेहनत सर्वांनी विश्वचषकात पाहिलीय. विश्वचषक कसा होईल? संघ कसे खेळतील? याबाबत सर्वांच्याच मनात कुतुहल होते, पण नवख्या संघांनीही आपल्याला खो-खो खेळता येत असल्याचे दाखवल्यामुळे आता खो-खो थांबणार नाही. भले इथपर्यंतच्या प्रवासासाठी आम्हाला खूप काळ लागला, पण पुढचा प्रवास सुपरफास्ट असेल. आता खो-खोसाठी राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक दूर नाही. अवघं जग मऱहाटमोळय़ा खो-खोच्या प्रेमात पडणार, असे भाकित प्रतीक वाईकर याने आत्मविश्वासाने वर्तवले.