नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची तक्रार 

एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या बहिणीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस चौकशी करण्याचे व त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत.  मलिक यांनी यास्मिन वानखेडे यांच्यावर विविध ट्विट आणि मुलाखतींमध्ये खोटे, बदनामीकारक व निंदनीय आरोप केल्याचा दावा केला आहे. कुटुंबावर दबाव आणण्यासाठी नवाब मलिक यांनी विविध आरोप केले असून याप्रकरणी यास्मिन यांनी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आशिष  आवारी यांनी आज याची दखल घेत पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले व 15 फेब्रुवारी रोजी चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले.