कला, क्रीडा-कार्यानुभव शिक्षकांचे आंदोलन, 100 पेक्षा कमी पट असलेल्या निदेशकांवर अन्याय

राज्यात 2012 ते 2019 पर्यंत काम केलेल्या राज्यातील 100 पेक्षा कमी पट झालेल्या सर्व निदेशकांना नेमणूक मिळावी, विस्थापित झालेल्या निदेशकांना ते ज्या शाळेवर कार्यरत होते त्याच शाळेवर त्वरित नेमणूक मिळावी, सर्वांना नियुक्ती मिळाल्यानंतर ती नियुक्ती कायम करणे, त्यासाठी कायम संवर्ग तयार करणे, किमान वेतन व सर्व निदेशकांना शिक्षकाचा दर्जा देणे या प्रमुख मागणीसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील 2012 ते 2019 पर्यंत काम केलेल्या सर्व कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना नियुक्ती मिळण्यासाठी कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक कृती समितीच्या वतीने 23 सप्टेंबर 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेमध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर व तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व निदेशकांच्या नेमणुकीसंदर्भात 100 पट होण्यासाठी दोन, तीन व गरज पडल्यास चार, पाच शाळा एकत्र करू असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकात 100 पेक्षा कमी पट असलेल्या निदेशकांच्या नियुक्तीसंदर्भात कोणतीच सूचना केली नाही. त्यामुळे राज्यातील 100 पेक्षा कमी पट असलेल्या निदेशक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. शिवाय 100 पट असलेल्या निदेशकांच्या शाळेवर याचिकाकर्त्यांना नियुक्ती दिल्याने विस्थापित झालेल्या अनेक निदेशक शिक्षकांना अद्याप नेमणूक मिळाली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या आंदोलनात पृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार, महेश कुलकर्णी, भागवत शिंदे, कल्पना गरुड, पुष्पा राहागंडाले, प्रिया बीसेन, सुयोग सस्कर, युवराज पाटील, सुहास पाटील यांच्यासह अनेक निदेशक उपस्थित होते.