घरातून कापडी पिशवी घेऊनच निघा ! पालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू, पहिल्याच दिवशी दीड लाखाची प्लॅस्टिकबंदी

स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेने प्लॅस्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून आज पहिल्या दिवशी 1145 जणांवर कारवाई करून 1 लाख 45 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आगामी काळात सर्व वॉर्डांमध्ये ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, घरातून निघताना कापडी पिशवीच घेऊन निघा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले होते. या महापुराला प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचे समोर आले. त्यामुळे 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. यावेळी प्रचंड मोठय़ा प्रमाणात पालिकेने जनजागृती केल्यामुळे मुंबईकरांनी पालिकेच्या आवाहनाला साथ देत प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद केले होते. मात्र कालांतराने कारवाई थंडावल्याने मुंबईभरात बेमालूमपणे प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला आहे.

सर्वाधिक कारवाई चेंबूरमध्ये

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एम/वेस्ट चेंबूर विभागात 97 जणांवर करण्यात आली. त्याखालोखाल आर/दक्षिण विभाग कांदिवलीमध्ये 83  ठिकाणी व्हिजिट करून ही कारवाई करण्यात आली. तर सर्वात कमी म्हणजे सी वॉर्ड मुंबई सेंट्रल विभागात कोणतीही कारवाई झालेली नाही.

फेरीवाल्यांसह ग्राहकांनाही दणका

प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरल्यास नियम मोडणारे फेरीवाले, दुकानदार, साठवणूक करणाऱ्यांसह ग्राहकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

29 जणांवर गुन्हे

z प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरल्याच्या पहिल्या गुह्याचा दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पहिल्या दिवशीच 29 जणांविरोधात पालिकेने गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली.

z 20 जानेवारीपासूनच्या कारवाईत 6928 ठिकाणी 7 लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर 288.01 किलो प्लॅस्टिक जप्त, 149 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

पंचवीस हजारांपर्यंत दंड

  • पहिल्या गुह्याला – पाच हजार
  • दुसऱ्या गुह्याला – 10 हजार
  • तिसऱ्या गुह्याला – 25 हजार

दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई