25 वर्षीय महामंडलेश्वर ममता वशिष्ठ यांनी सर्वांचे लक्ष वेधले. किन्नर आखाडय़ाचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ममता यांना पिंड दान आणि त्यांचा पट्टाभिषेक सोहळा पार पडला. महामंडलेश्वर झाल्यानंतर आखाडय़ास पुढे नेणे आणि समाज तसेच सनातन धर्मासाठी काम करायचे असल्याचे ममता यांनी सांगितले. ममता यांचे दोन महिन्यांपूर्वी संदीप वशिष्ठ यांच्यासोबत लग्न झाले. वयाच्या सातव्या वर्षापासून ममता यांचा कल सनातनकडे होता. ‘मला माझ्या पतीचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही मला सहकार्य केले. मात्र आजही माझ्या विरोधात अनेक लोक आहेत. मी गेल्या सहा वर्षांपासून किन्नर आखाडय़ातील महामंडलेश्वर स्वामी पार्वती नंद धुलिया गिरी यांच्या संपर्कात होते. रविवारी मला महामंडलेश्वर बनवण्यात आले’, असे ममता यांनी सांगितले.
100 हून अधिक महिला झाल्या नागा संन्यासी, इटली, फ्रान्स आणि नेपाळच्या महिलेचाही समावेश
कुंभमेळ्यात 100 हून अधिक महिलांना नागा संन्यासी म्हणून दीक्षा देण्यात आली असल्याची माहिती जुना आखाडय़ाच्या महिला संत दिव्या गिरी यांनी दिली. यामध्ये तीन परदेशी महिलांचा समावेश आहे. या सर्वांची 12 वर्षांची सेवा आणि गुरुप्रती समर्पण पाहून त्यांना ‘अवधूतनी’ अर्थात आश्रमातील सर्वोच्च व्यक्ती बनवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. दीक्षा घेणाऱया सर्व महिलांचे गंगेच्या तीरावर मुंडन करण्यात आले. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या हस्ते अंतिम दीक्षा देण्यात येणार आहे. परदेशी महिलांना दीक्षा दिल्याने त्या जुना आखाडय़ाच्या सदस्य झाल्या. इटलीतील बांकिया मरियमला शिवानी भारती, फ्रान्सच्या वॅकेन मेरीचे नाव कामाख्या गिरी आणि नेपाळच्या मोक्षिता राणीचे नाव मोक्षिता गिरी असे करण्यात आले आहे.