नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर शनिवारी कोल्ड प्लेचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी धडपड केली. काहींना तिकीट मिळाले तर काहींना तिकीट न मिळाल्याने निराश व्हावे लागले, परंतु मुंबईतील एका तरुणीला दोन तिकिटे मिळाली. परंतु कार्यक्रमाच्या दिवशी तिच्या मोलकरणीने ही तिकिटे कचऱयाच्या डब्यात फेकली. या तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली दुःखभरी कहानी कथन केलीय. आम्हाला कोल्ड प्लेची दोन तिकिटे मिळाली आणि ती डायनिंग टेबलवर एका रॅपरमध्ये ठेवली गेली. आज आम्ही तयार झालो, ड्रायव्हर वाट बघत होता आणि निघताना तिकिटे सापडली नाहीत.
साफसफाई करताना त्यांना फेकून देण्यात आल्याचे आमच्या मोलकरणीने सांगितले. हे ऐकून आम्हाला प्रचंड धक्का बसला. आम्ही तत्काळ कचराकुंडीवर धाव घेतली. तिकिटे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने तिकिटे मिळाली नाहीत, असे या तरुणीने सांगितले. कचराकुंडीवर तिकिटे शोधत असल्याचा व्हिडीओसुद्धा या तरुणीने शेअर केला आहे.