Ratnagiri – 61 लाखांचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना हैद्राबाद येथून अटक

अँजो कॅपिटल या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून कंपनीची बनावट ट्रेडिंगची लिंक पाठवून एका व्यक्तीला 61 लाख 22 हजार 811 रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन आरोपीना रत्नागिरी पोलिसांनी हैद्राबाद येथे अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीला बनावट ट्रेडिंगची लिंक पाठवून 61 लाख 22 हजार 811 रुपये गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी फिर्यादीने प्रयत्न केले असता त्याला वेगवेगळी कारणे देऊन अधिक रक्कम भरण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आर्थिक व्यवहारात बँकांकडून प्राप्त झालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना आरोपी निवास पेद्येया आणि उदय लक्ष्मण दोरापल्ली यांचा शोध घेत हैद्राबाद येथून ताब्यात घेत अटक केली.

या आरोपीवर हैद्राबाद येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलीस हवालदार रामचंद्र वडार, संदीप नाईक, संतोष कोळेकर, सौरभ कदम, दशरथ कांबळे, शशांक फणसेकर, प्रवीण खांबे यांनी केली