सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर व केंद्र सरकारवर निशाणा साधला. ”देशाच्या सीमांची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे बांगलादेशींची घुसखोरी हे भाजपचे अपयश आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”पोलिसांनी चातुर्य दाखवून सैफवर हल्ला करणाऱ्याला पकडलं. तो एक बांगालादेशी आहे. या घटनेवरून एक कळतं की आपल्या पोलिसांना मोकळं मैदान दिलं, गृहखात्याने पोलिसांचे हात बांधले नाही तर ते आरोपीला कुठेही जाऊन पकडतील व त्याला न्यायालयासमोर हाजीर करतील. पण जर गृहखात्याची इच्छाच नसेल तर संतोष देशमुख सारख्या प्रकरणी आरोपीला शरण यावं लागलं. पोलीस त्याला पकडू शकले नाही. सरकार त्याला प्रोटेक्ट करत होती का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
”हा माणूस बांगलादेशवरून येऊन आपल्या देशातील व्यक्तीवर हल्ला करत असेल. ही व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी. भाजपने मध्यंतरी बांगलादेशी हटाव मोर्चे काढले. अकरा वर्ष झाली यांचं केंद्रात सत्ता आहेत. महाराष्ट्रात देखील आठ साडे आठ वर्ष भाजपचं सरकार आहे. मला वाटतं भाजपने एकट्याने मोर्चे काढण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा काढूया व मोदींना विचारूया की केंद्रातलं आपलं जे बहुमताचं सरकार आहे ते अकार्यक्षम आहे का? तुमच्या देखरेखीत हे घुसतातचं कसे? हा हल्लेखोर सात आठ महिने जिथे अकार्यक्षम मुख्यमंत्री राहतात तिथे राहिला. एकीकडे चीन घुसतोय, बांगालदेशी घुसतायतय. बांगालदेशात हिंदू आक्रोश करत आहेत आम्हाला देशात घ्या. त्यावर हे भाजप काही करू शकत नाही. त्याच भाजपच्या केंद्र व राज्य सरकारमध्ये राज्यात एक बांगालदेशी येऊन आपल्यावर हल्ला करतो ही धोकायदायक गोष्ट आहे. हे भाजपचं सरकार किती अपयशी ठरलंय याचं मोजमाप जनता करू शकते. देशाच्या ब़ॉर्डरची सुरक्षा केंद्राची आहे त्यामुळे या घुसखोरीचे अपय़श भाजपचे आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.