ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश टी. वाघमारे यांची राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात लवकरच महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणूकांची जबाबदारी वाघमारे यांच्यावर असणार आहे. राज्य सरकारतर्फे आज सरकारी आदेश काढून त्यांच्या नावाची घोषणा केली. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील.
सरकारी आदेश –
भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 243-के व अनुच्छेद 243-झेडए आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, 1994 मधील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्राचे राज्यपाल, दिनेश टी. वाघमारे यांची, दिनांक 20 जानेवारी, 2025 पासून किंवा त्यानंतर ते ज्या तारखेला कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार घेतील, त्या तारखेपासून राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करीत आहेत. दिनेश टी. वाघमारे हे सदर पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिनांकापासून 5 वर्षांकरीता हे पद धारण करतील आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. त्यांच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती ह्या राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, 1994 मधील तरतुदीनुसार असतील.
राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील.