थोडीतरी लाज बाळगा! पालकमंत्रीपदाच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंनी सुनावले

पालकमंत्रीपदाची यादी मागे घेण्यात आली आहे. गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला तसेच पालकमंत्री पद, बंगले ह्यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा! या शब्दात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या मंत्र्यांना सुनावले आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आलीय! हे नक्की काय चाललंय? मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे. पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली आहे.

तसेच मंत्रिपद मिळवूनदेखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत. पालकमंत्री पद, बंगले ह्यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा! आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत? जाळपोळ, दादागिरी मंत्र्यांचेच काही लोकं करणार आणि एवढी मोठी जबाबदारी स्थगित होणार? हा पॅटर्न आहे का? असा सवाल करत दुसरीकडे बीड आणि परभणीची जनता न्यायासाठी आक्रोश करत असताना, ती जनता मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत, मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय असेही आदित्य ठाकरे म्हणाले.