उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे जेव्हा रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता, भाजप मिंधे आणि अजित पवार गटही फोडू शकतात असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मंत्रीमंडळाने शपथ घेतल्यानंतर कसेबसे खातेवाटपाला विलंब झाला. आता खातेवाटप होऊन कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परदेशात जाण्यापूर्वी पालकमंत्री घोषित केले, तर त्यातही धुसफूस सुरू आहे. एका मंत्र्याने तर रायगडमध्ये रस्तारोको केला, धमक्या दिल्या. हे खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय. भाजपकडे पुरेसे बहुमत आहे. त्यांच्या दोन मित्रपक्षांची ताकद चांगली आहे. 220-25 च्या वर बहुमत असताना, हे मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद दिल्यानंतर स्थगिती देतात. आता कॅबिनेटमध्ये आपापसांत खुन आणि मारामाऱ्या व्हायच्या बाकी आहेत. उद्या जर बातमी आली की अमूक अमूक उपमुख्यमंत्र्याच्या गटाने अमूक गटाच्या नेत्यावर हात उचलला आता एवढेच पाहणं महाराष्ट्राच्या नशीबी आहे. एवढ्या भयंकर पद्धतीने महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि सरकार सुरू आहे. आमचे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना राग आला की ते गावी जाऊन बसतात. सरकार कुणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे-फुगवेनुसार चालणार आहे का? लोकांचे प्रश्न, राज्याच्या समस्या आहेत. तुमचे राग लोभ तुमच्यापाशी ठेवा. तुमच्या हाती सत्ता आहे, या सत्तेचा तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा. पण रोज तुमचे राग, रुसवे फुगवे, अडवणूक, स्थगिती हे केव्हातरी बंद व्हायला पाहिजे. हे यासाठी होत आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अजून सावरलेले नाहिये. एवढा मोठा विजय त्यांना पचवता येत नाहिये. एवढा मोठा विजय कसा मिळवला, या भ्रमात आणि धक्क्यात ते सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाहियेत असे संजय राऊत म्हणाले.
तसेच दरे गाव हे शिंदेंसाठी दावोस आहे. तिथे बसूनच ते राज्य करतात. पक्षासाठी, कुंटुंबात, कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात. एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आत्मा आहेत. खरंतर त्यांनी यावेळेला महाकुंभमध्ये नागासाधूंसोबत जाऊन बसायला हवं होतं. कारण नागा साधूही फार अस्वस्थ असतात. अघोरी विद्या करतात, नाचतात. महाराष्ट्रात या क्षणी जे अस्वस्थ आहेत त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजच्या तीर्थावर साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जावं आणि गंगेत डुबकी घ्यावी, काही धर्मकार्य करावे. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता ही महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे. जितके दिवस कुंभ आहे तिथे महाराष्ट्रातल्या अस्वस्थ मंत्र्यांनी जाऊन ध्यानधारणा करावी असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
एकनाथ शिंदे नाराज का आहेत, याचे कारण कळाले पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं. नाराजीचे कारण काय आहे? पद, प्रतिष्ठा, पैसा, खंडणी काय आहे हे एकदा मला कळालं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे संपलेले नाहीत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही संपवण्याच्या वल्गना केल्या गेल्या. पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे यांना संपवल्याची भाषा काँग्रेसवाले करत आहेत. काँग्रेसवाले कुठे आहेत? शिवसेना संपली नाही आणि शिवसेना संपणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा उसळी घेऊ. भारतीय जनता पक्षाची ही कुटनीती आहे. याला संपव, त्याला संपव, याला फोडा, त्याला विकत घ्या. एकनाथ शिंदेंच्या बाबतीत तेच होणार जे त्यांनी आमच्या शिवसेनेच्या बाबतीत केलं. भाजप मोदी शहा हे कुणालाही सोडत नाही. विशेषतः जे त्यांचे सख्खे आहे, त्यांच्यासोबत आहेत त्यांना ते सोडत नाहीत. सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुख्यमंत्री उदय सामंत यांना दावोसला घेऊन गेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार आहेत. सरकार स्थापन करताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा ‘उदय’ होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वालाखाची झाली. भाजप महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील. शिंदे गट आणि अजित पवार गटही फोडतील. भाजपचं फोडाफोडी हेच जीवन आहे आणि राजकारण आहे असेही संजय राऊत म्हणाले.
धनंजय मुंडे म्हणाले की पहाटेचा शपथविधी हे अजित पवार यांच्याविरोधात षडयंत्र होतं. हे षडयंत्र कुणी रचलं? धनंजय मुंडे यांनी आता का नाही ओरडून सांगितलं? शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादा हे चुकीचं करतोय आपण, शरद पवार यांना या वयात त्रास देणं, त्यांनीच निर्माण केलेला पक्षात अशा प्रकारे बेईमानी करणे हे योग्य नाही असे का नाही म्हणाले?. पहाटेच्या शपथविधीविरोधात तुम्ही ओरडत होतात मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं? ही सगळी बकवास आहे. धनंजय मुंडेंना एवढी रहस्य माहित असतील तर संतोष देशमुख यांचा खुन कोणी आणि कशासाठी केला हे सांगावं. कोणीही बीडला बदनाम करत नाहीत, बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात. मंत्री, पालकमंत्री, सत्ताधारी. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. तुम्ही ज्या टोळ्या पोसल्यात, ताकद दिली, खुन केले, त्यामुळे बीड बदनाम झालं.
अजित पवार यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितले आहे. त्यांना चक्की पिसवायला पाठवणार होते. पंतप्रधान मोदींनीही सांगितले होते की काय प्रतिमा आहे. आता वॉशिंग मशीनमध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तुमचा प्रश्न. कोणी बोलावं या गोष्टीवर? असेही संजय राऊत यांनी नमूद केले.