गोमुत्रामध्ये औषधी गुणधर्म, IIT मद्रासच्या संचलाकांच्या विधानामुळे वाद

IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांवर बोलताना दिसत आहे. तसेच गाईंच्या जातींचे संरक्षण आणि शेतीचे महत्त्व यावर देखील संचालक व्ही. कामकोटी यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.

बुधवारी 15 जानेवारी रोजी पोंगल सणाच्या दिवशी चेन्नईतील गोशाळेत आयोजित कार्यक्रमात कामकोटी यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी तीव्र तापाने त्रस्त असलेल्या एका साधूच्या जीवनातील प्रसंग सांगितला. एका साधूला प्रचंड ताप आला होता. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडे न जाता गोमूत्राचे सेवन केले. गोमूत्र सेवन करून पुढील 15 मिनिटात त्यांचा ताप उतरला. गोमूत्रामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात.” हे पचनासाठी देखील उपयुक्त आहे. त्यामुळे याचा आपल्या शरिराला बराच फायदा होतो, असे कामकोटी यांनी सांगितले.

आयआयटी संचालकांनी ‘गाय संवर्धन’ आणि शेतीवर महत्त्वाची टिपणी केली. यामागचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे त्यांनी सांगितले. माणसांनी आपण सेंद्रिय, नैसर्गिक शेतीवर भर देणे गरजेचे आहे. देशी गाई, बैल हे सेंद्रिय शेतीचा भक्कम पाया आहेत. यासाठी देशी गाईना संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे गायींच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, गोमूत्राबाबत आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांच्या वक्तव्यावर टीका केली जात आहे. सत्ताधारी पक्ष द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्यांनी व्ही. कामकोटी यांचे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. देशातील शिक्षण बिघडवण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्याचा आरोप द्रमुक नेते टीकेएस एलांगोवन यांनी केला. कामकोटी यांनी आपल्या दाव्यासाठी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.