बीडमध्ये भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव बसने चिरडले

पोलीस भरतीसाठी महामार्गावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसने धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घोडका राजुरी फाट्यावर आज रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (20), विराट बब्रुवान घोडके (19), ओम सुग्रीव घोडके (20) यांचा समावेश आहे.

ही बस बीडहून परभणीकडे जात होती. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे तरुण पहाटे धावण्याचा सराव करतात. पाच तरुणांना एसटी बसने धडक दिल्याची माहिती मिळताच घटना स्थळावर एकच गर्दी झाली. संतप्त गावकऱ्यानी एसटी अडवून तुफान दगडफेक करून बसची तोडफोड केली. यात बसच्या काचा फुटल्या. त्यानंतर गावकऱ्यानी चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर

तालुक्यातील घोडका राजुरी येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तीन तरुणांना एस.टी. बसने चिरडल्याची घटना अत्यंत दुःखदायक असल्याची भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. तसेच सदरील तरुण हे गरीब असल्याने शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी, अशी मागणीही घोडका राजुरी ग्रामस्थ, मृतांचे नातेवाईक व मतदारसंघाच्या वतीने आमदार संदीप क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्रीमहोदयांनी प्रत्येकी दहा लक्ष रुपये इतकी मदत जाहीर केली आहे.