बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या खंडणी उकळणाऱ्या आणि खून करून दहशत माजवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांची साखळी तोडण्यासाठी गावागावातील जनतेने सतर्क राहून या टोळ्यांचा मुकाबला करावा. तसेच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्याना फाशी झालीच पाहिजे, असा एल्गार आज रविवारी सर्वपक्षीय जनतेने छत्रपती संभाजीनगरमधील जनआक्रोश मोर्चात पुकारला. हजारोंच्या संख्येने उपस्थित मोर्चेकऱ्याच्या अन्यायाविरोधातील घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.
सकल मराठा समाजाच्या वतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यू या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज रविवारी सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांनी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मूक मोर्चा काढला. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांनी अभिवादन केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मूक मोर्चा सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, रंगार गल्ली, सिटी चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्ते हातात भगवे, निळे, हिरवे झेंडे आणि ‘आरोपींना फाशी झालीच पाहिजे’, ‘ना जात, ना पात, अन्यायावर आघात’, ‘लढा फक्त माणुसकीचा’ अशा घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाले होते.
गुन्हेगारी साखळीने संतोषचा बळी घेतला – जरांगे-पाटील
याप्रसंगी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, संतोष देशमुखला न्याय मिळाल्याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांपासून एक इंचही हलणार नाही. सूर्यवंशी कुटुंबीयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या लाँग मार्चला गावागावातील नागरिकांनी, समाज बांधवांनी सहकार्य करावे. देशमुख हत्या प्रकरणातील एका आरोपीला 40 दिवस उलटूनही अद्याप अटक झालेली नाही. याचे स्ट्राँग नेटवर्क कल्पनेपलीकडचे आहे. या स्ट्राँग नेटवर्कने संतोषचा बळी घेतला आहे. राजाश्रय लाभल्यानेच या टोळय़ा खंडणी, खून, बलात्कार, मारामाऱ्या, छेडछाड, अपहरण करून दहशत पसरवत आहेत. धनंजय मुंडे यांच्या या टोळय़ा संपवाव्या लागणार आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी गाफील राहू नका, न्यायासाठी संघर्षाची तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. शब्दाला जागा, विश्वासघात करू नका, नसता सामना आमच्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
वैभवीच्या भाषणाने अश्रू अनावर
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी ही मोर्चात सहभागी झाली होती. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ती पायी चालत आली. तेथे भाषणात तिने आपला आक्रोश व्यक्त केला. ही माझ्या वडिलांची नव्हे तर माणुसकीची हत्या झाली आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वधर्मीयांनी एकत्रित येऊन आमच्या पाठीशी ताकद उभी केली. आज माझे वडील नाहीत. त्यांची क्षणोक्षणाला आठवण येते. बापाचे छत्र काय असते, हे दुसऱ्याकडे पाहिल्यानंतर कळते. माझ्या काकाच्या खांद्याला खांदा लावून न्याय मिळविण्यासाठी तुमच्या ताकदीवर हा लढा सुरू आहे. देशमुख, सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन करताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या वेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनीही भावना व्यक्त केल्या. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. सभेचे सूत्रसंचालन गणपत मस्के यांनी केले.
देशमुख, सूर्यवंशी कुटुंबीय व्यासपीठावर
दिल्ली गेट प्रवेशद्वारावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. या व्यासपीठावर संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, आमदार अनुराधा चव्हाण, माजी खासदार इम्तियाज जलील, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील, दीपक केदारे, भीमशक्तीचे राज्याध्यक्ष दिनकर ओंकार, प्रा. मोहन देशमुख आदींची उपस्थिती होती.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा – आंबेडकर
पुरोगामी महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र या, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना परभणी आणि बीड जिल्हय़ांत घडल्या आहेत. असे असताना न्यायासाठी मोर्चे काढावे लागत आहेत. हे मोठे दुर्दैव. या दोन्ही घटनांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोन्ही प्रकरणांतील न्यायालयीन चौकशी छत्रपती संभाजीनगर येथे करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. देशमुख, सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, अशीही मागणी त्यांनी केली.
निकम न्याय मिळवून देऊ शकत नाहीत -ओंकार
भीमशक्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर ओंकार म्हणाले, हे सरकार गेंड्याची कातडी पांघरुण बसले आहे. आरोपी वाल्मीक कराडला सोडविण्यासाठी सुदर्शन घुलेवर हे प्रकरण टाकले जात आहे. सरकारी वकील लढत नाही. हे सर्व षड्यंत्र असून सरकार पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांचा मुलगा धनंजय मुंडे यांचे खटले चालवीत आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकणार नाहीत. त्याऐवजी दुसरे सरकारी वकील नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली.
अन्यायाविरुद्ध सर्वधर्मीयांनी एकत्र यावे – जलील
सर्व धर्मीयांनी जात-धर्म विसरून या मूक मोर्चात एकजूट दाखविली आहे. अशीच एकजूट अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वधर्मीयांनी दाखवून एकत्र यावे, असे आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
राज्यात गुंडाराज चालू – दानवे
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, गुंडाराज आणि मस्तीराज चालू असून अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला दोन दिवसांत पकडले. मात्र 40 दिवस झाले तरीही संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले जात नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारल्याशिवाय न्याय मिळणार नाही का, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.