दोन सामने हरलो, पुढचा सामना जिंकणारच; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

ठाण्यातील दोन सामने आम्ही हरलो असलो तरी पुढचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, असा जबरदस्त विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ठाणे महापालिकेची येणारी निवडणूक अतिशय महत्त्वाची असून ती अस्मितेची मॅच आहे. त्यामुळे ही मॅच आम्ही जिंकून दाखवू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

खारकर आळी येथील मैदानावर शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांनी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत  16 संघांनी भाग घेतला. खारकर आळी क्रिकेट क्लब आणि न्यू जरीमरी क्रिकेट क्लब यांच्यात अटीतटीचा झालेला सामना रंगतदार ठरला. हा सामना पाहण्यासाठी खासदार संजय राऊत आवर्जून उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपनेते विजय कदम, स्पर्धेचे आयोजक सचिन चव्हाण, विभागप्रमुख प्रशांत सातपुते, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राहुल पिंगळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. दरम्यान संजय राऊत यांनी शक्तीस्थळावर जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.

जरीमरी क्रिकेट क्लब संघ विजेता ठरला. या संघाला हिंदुहृदयसम्राट चषक व 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक संजय राऊत यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहुल सोणकर तर उत्कृष्ट फलंदाज फर्मान खान  याला सन्मानित केले. मालिकावीर हा किताब चेतन अहिरे याने पटकावला.

मुंबईतील चोरटय़ाला ठाण्यात पकडलेठाण्यातील चोराला मुंबईत पकडू

अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसलेल्या हल्लेखोरास ठाण्यात आज पकडले. त्याचा संजय राऊत यांनी भाषणात खास उल्लेख केला. ते म्हणाले, मुंबईतील चोरटय़ाला पोलिसांनी ठाण्यात पकडले, आता ठाण्यातील चोर आम्ही मुंबईत पकडू. दरम्यान, मुंबई येथे घडलेल्या भीषण बोट अपघातामध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांचे प्राण वाचवणाऱया आरीफ बामणे आणि चोरांचा पाठलाग करून चोर पकडून देणाऱया ढोकाळी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख चेतन चौधरी यांचा सत्कार केला.