कुणीही यावे, मजूर म्हणून राहावे; ठाण्यातील लेबर कॅम्पचे गूढ वाढले

चित्रपट अभिनेता सैफ अली खान याचा हल्लेखोर मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद याच्या पोलिसांनी ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मध्यरात्री मुसक्या आवळल्या. या फिल्मीस्टाईल थरारानंतर कासारवडवलीच्या जंगलात असलेल्या लेबर कॅम्पचे गूढ निर्माण झाले आहे. मेट्रोचे काम करणारे मजूर या कॅम्पमध्ये  गेल्या काही वर्षांपासून राहत असल्याची माहिती उघडकीस आली असून  देशाच्या विविध भागांतून पोटापाण्यासाठी हे मजूर येथे येतात. मात्र त्यांची सखोल चौकशी कंत्राटदारामार्फत केली जाते की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कुणीही यावे आणि मजूर म्हणून राहावे अशी या लेबर कॅम्पची स्थिती झाली आहे.

ठाण्यात सध्या विविध ठिकाणी मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोसाठी लागणारे सिमेंटचे पिलर्स, गर्डर आदी साहित्य बनवण्याचे काम वाघबीळ गावाजवळ असलेल्या एका भागात चालते. त्याला लागूनच  हिरानंदानी इस्टेट ही उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. त्या ठिकाणी ठेकेदाराने मेट्रोचे साहित्य तयार करण्याचा प्लाण्ट उभारला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तेथे काम चालते. या प्लाण्टपासून थोडय़ाच अंतरावर मजुरांना राहण्यासाठी पत्र्याच्या तात्पुरत्या खोल्या उभ्या केल्या आहेत. या खोल्यांना लागूनच कांदळवनाचे जंगलदेखील आहे.

बांगलादेशींचीही घुसखोरी

मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठेकेदाराकडे विविध राज्यांतील मजूर काम करीत आहेत. त्यामध्ये आता बांगलादेशींनीदेखील घुसखोरी केली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या घुसखोरांना हुडकून त्यांची बांगलादेशात पुन्हा हकालपट्टी करावी, अशी मागणीही ठाणेकरांनी केली आहे.

उत्तर प्रदेशपासून कोलकातापर्यंत

पत्र्याचे शेड्स उभारल्याने मजुरांशिवाय तिथे फारशी वर्दळ नसते. या शेडमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, कोलकाता अशा विविध ठिकाणांहून आलेले सुमारे चारशे मजूर राहतात. त्यांना कामावर ठेवण्यापूर्वी पॅन कार्ड, आधार कार्ड, वास्तव्याचे पुरावे असे महत्त्वाचे कागदपत्र तपासणे अभिप्रेत आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच मजुरांना कामावर ठेवले आहे काय? याची चौकशी आता पोलीस करीत आहेत.

प्रत्येकाची चौकशी केली

सैफ अली खानवर हल्ला करणारा शहजाद हा या लेबर पॅम्पमध्ये कसा घुसला, त्याला कोणी थारा दिला असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. लेबर कॅम्पमधील मजुरांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला दिली होती काय, याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी  रात्री उशिरा या लेबर पॅम्पवर छापा टाकल्यानंतर मजुरांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी सर्व मजुरांना मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर काढून  प्रत्येकाची चौकशी केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांचीदेखील पडताळणी केली.