अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत आज मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी आपण अजितदादांना सांगत होतो… भारतीय जनता पक्षासोबत जाऊ नका, हे षड्यंत्र आहे, त्यांच्या पायाही पडलो. पण त्यांनी शपथ घेतली, असे धनंजय मुंडे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवसंकल्प शिबीर शिर्डी येथे पार पडले. त्यात पहिल्या दिवशी धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्याने चर्चा रंगली होती. मात्र दुसऱया दिवशी त्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून आजपर्यंत आपण अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. 23 नोव्हेंबर 2019 रोजी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या वेळी शपथविधी झाला. त्यावेळी भाजपसोबत न जाण्याची विनंती आपण त्यांना केली होती, पण त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत कुरघोडय़ा सुरू झाल्या, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. या सर्व घटनाक्रमाचे साक्षीदार सुनील तटकरे आहेत, असा दावाही धनंजय मुंडे यांनी केला.
महायुतीतील नेतेच मला टार्गेट करताहेत
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दलही धनंजय मुंडे यांनी यावेळी भाष्य केले. देशमुखांच्या हत्येचे समर्थन केलेच जाऊ शकत नाही, आरोपींना फासावर चढवायला पाहिजे, पण या प्रकरणामुळे परळीला आणि आपल्याला नाहक बदनाम केले जात आहे. बीडचा बिहार झाल्याची टीका होत आहे, असेही मुंडे म्हणाले.