शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा नीच अपप्रचार करणाऱयांनो, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आणि प्रबोधनकारांचा नातू हिंदुत्व सोडू शकतो का? आम्ही हिंदू आहोत, हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही.
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे, मात्र राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा तेवढाच मोठा अधर्म आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला.
अखिल भांडुप वारकरी सांप्रदाय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास उद्धव ठाकरे उपस्थित होते. पांडुरंगाच्या दर्शनानंतर सामूहिक आरतीमध्येही ते सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर आज आपण पहिल्यांदा संतसज्जन आणि वारकरी बांधवांच्या आशीर्वादाने माईक हाती घेतला आहे. माझ्या नववर्षाची सुरुवात आजपासून पांडुरंगाच्या दर्शनाने झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका करणाऱयांचा समाचारही उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा घेतला.
याप्रसंगी खासदार संजय दिना पाटील, शिवसेना आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर, विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकर आदी उपस्थित होते. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पारायणही या हरिनाम सप्ताहात करण्यात आले.
धर्माच्या नाडय़ा कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही
सत्तेची कास धरणारे अनेक आहेत, पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाचा अनुल्लेखाने चांगलाच समाचार घेतला. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर संकटे आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख कणखरपणे उभे राहिले. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे म्हणणारे देशातील एकमेव व्यक्ती म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना लोक हिंदुहृदयसम्राट म्हणू लागले. त्याआधी त्यांनी आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्मातल्या वाईट, अनिष्ट रूढी व परंपरांविरुद्ध लढा दिला. मात्र आता हिंदू धर्म कोणत्या दिशेने चालला आहे, कोण नेत आहे, धर्माच्या नाडय़ा कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अगदी घरात घुसून वार करणारेसुद्धा काही लोक आहेत, त्यांना मी वारकरी नाही म्हणत, ते अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत. पण अशी ही संस्कृती आली कुठून? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एकमेकांचा सन्मान करण्याचा संस्कार मागे पडत चाललाय
मला इथे राजकारण आणायचे नाही, पण ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकला जात आहे ते पाहून वाईट वाटते. एकमेकांचा सन्मान करणे, मातेचा मान राखणे, आदर राखणे हे सर्व संस्कार आता मागे पडत आहेत की काय असे वाटत आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी सद्य राजकीय स्थितीबद्दल व्यक्त केली. माणूस म्हणून जगायचे कसे हे संस्कार साधूसंतांनी दिले. भुकेलेल्याला अन्न देणे, उघडा असेल त्याला वस्त्र देणे, तहानलेल्याला पाणी देणे ही माणुसकी सत्तेच्या अधर्मामध्ये आम्ही राजकारणी विसरत चाललोय. सत्तेसाठी वाट्टेल ते करायला लागलो, सत्तेसाठी धर्माचा दुरुपयोग करायला लागलो तर त्या सत्तेच्या मार्गावरून कान धरून सत्याच्या मार्गावर आणण्याचे काम वारकरी बांधवांना करावे लागेल, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही
सत्तेची कास धरणारे अनेक आहेत, पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचा अनुल्लेखाने चांगलाच समाचार घेतला. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर संकटे आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख कणखरपणे उभे राहिले. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे म्हणणारे देशातील एकमेव व्यक्ती म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना लोक हिंदुहृदयसम्राट म्हणू लागले. त्याआधी त्यांनी आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्मातल्या वाईट, अनिष्ट रुढी व परंपरांविरुद्ध लढा दिला. मात्र आता हिंदू धर्म कोणत्या दिशेने चालला आहे, कोण नेत आहे, धर्माच्या नाडय़ा कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.