मुंबई महापालिकेच्या वतीने भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दरवर्षीप्रमाणे उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात पुष्पोत्सव भरवण्यात येणार आहे. यात विविध प्रजातीची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पतींसह सुमारे पाच हजार रोपांचा या पुष्पोत्सवात समावेश असणार आहे. 31 जानेवारीपासून सुरू होणार हे प्रदर्शन 2 फेब्रुवारीपर्यंत सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार आहे. पुष्पोत्सवाचे हे 28 वे वर्ष आहे.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दरम्यान, सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने केले आहे.
विशेष कार्यशाळा
प्रदर्शनावेळी उद्यान विभागाकडून तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत फुलपाखरू उद्यान, फुलांची आकर्षक सजावट, बोन्साय तसेच इकेबाना तंत्राचा वापर, पर्यावरणाला आवश्यक असलेल्या मायक्रोग्रीन आणि टेरॅरियमची उभारणी, घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत उद्यानविद्या याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळा सशुल्क असून कार्यशाळेत भाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
संपर्क-अमित करंदीकर-9321636622.