आजपासून ट्रम्प‘राज’

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी आजी-माजी अध्यक्ष लोकप्रतिनिधी आंतरराष्ट्रीय शिष्ट मंडळ आणि 2 लाख नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयानंतर ट्रम्प यांच्या शपथविधीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मावळते अध्यक्ष जो बायडेन, मावळत्या उपाध्यक्ष कमला हॅरिस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी आज अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.

ट्रम्प हे शपथविधीसाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथून हवाई दलाच्या सी-32 या लष्करी विमानातून त्यांनी उड्डाण केले. त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि मुलगा बॅरन ट्रम्पदेखील आहेत. या विमानाला स्पेशल एअर मिशन 47 असे नाव देण्यात आले आहे. मिशन 47 म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे विमान ट्रम्प यांना दिले आहे.

शपथविधीला अमेरिकेत विरोध

शपथविधीला अमेरिकेतच मोठय़ा प्रमाणावर विरोध होत असून देशाच्या अनेक भागांत आज त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. हजारो नागरिक त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आणि पोस्टर्स तसेच बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले.